Chandrayaan-3 : 23 ऑगस्ट, हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. भारताचा महत्वकांशी प्रकल्प, चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशभरातून इस्रो(ISRO) च्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, इतका मोठा भीमपराक्रम करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो, नासाचे वैज्ञानिक इस्रोच्या शास्त्रज्ञांपेक्षा जास्त कमावतात का? असे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील.
इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी याबाबत माहिती दिली आहे. माधवन नायर यांनी सांगितले की, आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनला आहे. पण, ही कामगिरी फत्ते करणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांचा पगार विकसित देशांच्या तुलनेत पाचपट कमी आहे, तरीदेखील त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शास्त्रज्ञांचा कमी पगार हेदेखील एक कारण आहे, ज्यामुळे आम्ही प्रत्येक मिशन कमी पैशात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
पैशासाठी कुणी काम करत नाही
ते पुढे म्हणाले की, इस्रोमध्ये तुम्हाला एकही करोडपती सापडणार नाही, प्रत्येकजण साधे जीवन जगतो. इथे काम करणाऱ्या कोणालाही पैशाची चिंता नाही, कारण प्रत्येकाच्या मनात देशासाठी योगदान देण्याची इच्छा आहे. आम्ही आमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करतो, आम्ही आमच्या मिशनमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर करतो, ज्यामुळे आम्हाला बजेट नियंत्रित करण्यात यश मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.
इस्रोने रचला इतिहास
चंद्रयान-3 च्या माध्यमातून भारताने नवा इतिहास रचला आहे. या मिशनचे एकूण बजेट 615 कोटी रुपये होते. आजच्या काळात अनेक बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपटांचे बजेट एवढेच आहे. इतक्या कमी पैशातही भारताने इतिहास रचून सर्वांना चकित केले आहे. आज भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा