Farmer Loan Waive: बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ‘कर्जमुक्ती’अंतर्गत ४० कोटी जमा

Farmer Loan Waive: जिल्ह्यातील २२ हजार ८०४ शेतकऱ्यांनी प्रोत्साहन लाभासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यामधील जाहीर झालेल्या तीन यादीतील मिळून १५ हजार ७६१ लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत.

Ratnagiri News: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waiver Scheme) 2022-23 या आर्थिक वर्षात 12 हजार 987 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४० कोटी २९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. लाभ मंजूर असलेले 2 हजार 783 शेतकरी अजून प्रतीक्षा करत आहेत.

शेतीशी निगडित कामांकरिता पिकासाठी शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून पीककर्ज घेतात. काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ही होते.

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नाही.

परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकले होते. त्यामुळे त्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती.

पण, अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली, पण त्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे नियमित कर्जफेड परत केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली.

२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची पहिली, दुसरी व तिसरी यादी शासनाने जाहीर सुद्धा केलेली आहे.

त्यामध्ये १५ हजार ७६१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २२ हजार ८०४ शेतकऱ्यांनी प्रोत्साहन लाभासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले होते. त्यामधील जाहीर झालेल्या तीन यादीतील मिळून १५ हजार ७६१ लाभार्थ्यांची नावे यादीत आली आहेत.

हा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आधार प्रमाणीकरण (KYC) करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होते. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार ९७८ जणांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे.

अद्याप तीन हजार ४६७ जणांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केले नाही. यातील १२ हजार ९७८ शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी २९ लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

Leave a Comment